Pune : पदवीधर मतदार नोंदणीत गडबडीची शक्यता : विश्वजीत कदम 

एमपीसी न्यूज : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वानुमते उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय असल्याचे सिद्ध होते. पण भाजपाकडून मतदारयादीत गडबड केल्याची शक्यता आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली.

कदम यावेळी म्हणाले, सोनिया गांधी आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्नाखाली महाविकास आघाडीतील सर्व तिन्ही पक्षांचा उत्तम समन्वय आहे. राज्याचा कारभार परस्पर सामंजस्य आणि संवादातून सुरू आहे. कोरोना काळात आर्थिक टंचाई असताना देखील निधी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिलमाफी देण्यासाठी निधी दिला.

त्यामुळे विनाकारण समन्वय नाही, संवाद नाही अशा अफवा काही जणांकडून पसरविल्या जात आहे. पदवीधर-शिक्षक करीता जे उमेदवार दिले त्यांचे काम सर्वजण एकदिलाने करत आहेत. राज्यातील पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल आणि आमची सामुहिक ताकद दिसून येईल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार वंदना चव्हाण आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पदवीधर मतदार यादीत नावे भलतीच, फोन नंबर भलत्याचाच असे प्रकार उघडकीस आले असून याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली असून त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.

यावेळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय भोसले, संजय बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.