Chakan : पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीमुळे चाकण एमआयडीसीमध्ये लोड शेडिंगची शक्यता 

एमपीसी न्यूज – चाकण (Chakan) येथील महापारेषणच्या 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे 10 ते 15 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.

SSC Result : दहावीत 31 पैकी 13 विषयांचा निकाल 100 टक्के

त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र, विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण (Chakan) येथील 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी 50 एमव्हीए क्षमतेचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला 110 मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी (दि.1) मध्यरात्रीनंतर बिघाड झाला.

त्याची तपासणी केला असता तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी मंगळवार (दि.6)पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरवर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे व उर्वरित 10 ते 15 मेगावॅट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र गरज भासल्यास नानेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा व खालुंब्रे या 22 केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

या सर्व वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचे 74 आणि लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकचे 3 हजार 850 असे एकूण 3 हजार 924 ग्राहक आहेत. विजेच्या भारनियमनाची गरज भासल्यास संबंधित वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.