Pimpri : वाहतुकीच्या नियमांचे पोस्टर लावले अन सिग्नल परिसर मोकळा झाला

पिंपरी पोलिसांच्या बॅनर मोहिमेनंतर सिग्नल परिसरात वाहने पार्क करणा-या वाहनांची संख्या घटली

एमपीसी न्यूज – शहरात वाहतूक कोंडी होण्यासाठी सिग्नल परिसरात होणारी बेकायदेशीर पार्किंग हे देखील सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे सिग्नल परिसरात बेकायदेशीरपणे वाहने पार्क करणा-या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबत पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 18) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंग नियमांबाबत जनजागृतीपर बॅनर लावले. बॅनर लावल्याच्या दुस-या दिवशी सिग्नल परिसर मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका दिवसात हा बदल झाल्याने वाहन चालकांबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण हा बदल पुढे किती दिवस चालू राहणार आहे, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच पोलीस ठाण्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व चौकांमध्ये वाहतूक नियम आणि जनजागृतीपर सुमारे 150 बॅनर लावण्यात येणार आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यासमोरील चौकामधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या चौकामध्ये ‘सिग्नलच्या आजूबाजूस 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करू नये. आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वाहन जप्त करण्यात येईल.’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

आज (बुधवारी) सकाळी चिंचवड येथील स्टेशन चौकामध्ये सिग्नलच्या आजूबाजूला एकही वाहन बेकायदेशीरपणे पार्क केलेले आढळले नाही. त्यामुळे रस्ता अगदी मोकळा झाला होता. ब-याच वेळेला सिग्नलचा वेळ संपला तरी वाहनांची रांग संपत नाही. काही वेळेला सिग्नलची वेळ वाढविण्याची मागणी केली जाते. मात्र वाहतुकीचा खोळंबा करणा-या अनधिकृत पार्किंगकडे कुणाचे लक्ष जात नाही. पिंपरी पोलिसांनी सिग्नलची वेळ वाढविण्याऐवजी बेकायदेशीरपणे लावलेली वाहने हटविण्याची मोहीम हातात घेतली आहे.

पोलिसांनी बॅनर लावले आणि वाहन चालकांना शहाणपण आले, असे जरी सध्या चित्र निर्माण झाले असले तरी हे चित्र कितपण खरे आहे हे पाण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी जाणे आवश्यक आहे. त्यामुळे लगेच आलेले हे शहाणपण किती दिवस टिकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले, “सिग्नलच्या आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केल्यामुळे सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना अडथळा होतो. सिग्नलवर जास्त वाहने थांबू शकत नाहीत. यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागतात. सिग्नलच्या वेळेत सर्व वाहने सिग्नल पार करू शकत नाहीत. थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना नियमांची माहिती व्हावी, तसेच नियमभंग केल्यास काय कारवाई होऊ शकते, याची नागरिकांना कल्पना असायला हवी. या उद्देशाने हे बॅनर लावण्यात आले आहेत. नागरिकांनी पहिल्या दिवशी वाहने हटवली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.