Hinjwadi : आयटी पार्कच्या शेजारील नेरे गावात रस्त्यावर खड्डेच-खड्डे!

एमपीसी न्यूज – आयटी पार्क हिंजवडी लगत असलेल्या नेरे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

आयटी पार्कमुळे हिंजवडी परिसरातील माण, मारूंजी, जांबे, नेरे, कासरसाई भागात अनेक गृहनिर्माण सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. आयटी पार्कमधील अभियंते या भागात वास्तव्यास आहेत. हिंजवडी कासरसाई या मुख्य रस्त्यावर नेरे गावच्या हद्दीतील रस्ता उखडला आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. वाहन चालवाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावरील चिखल राडारोडा आणि खड्यांमुळे दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत. अपघातांमध्ये वाढ झाली आहे.  या खड्ड्यांबाबत पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांनी सातत्याने तक्रार केली आहे. परंतु, अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.