Pune : पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अंगावर ऑईल ओतले 

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्या अंगावर सहकारी कर्मचा-यांनी ऑईल ओतून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (1 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. या दोन्ही कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. अभिजीत साठे (बांधकाम सहाय्यक) आणि नितीन प्रसाद (स्विपर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अभिजीत साठे आणि नितीन प्रसाद यांच्यात कामावरून वाद होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पाटील हे नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आले आणि गाडीतून उतरताच आरोपींनी त्यांच्या अंगावर काळे ऑईल ओतले. तसेच मारहाण करण्यासाठी त्यांनी मोठा दगडही आणून ठेवला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतू इतर कर्मचा-यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान ऑईल ओतलेल्या अवस्थेतच राजेंद्र पाटील यांना चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. परंतू कुलगुरुंना भेटल्याशिवाय पाटील यांना ससून रुग्णालयात नेऊ देणार नाही, असा पवित्रा उपस्थित कर्मचा-यांनी घेतला. त्यानंतर कुलगुरुंना भेटण्यासाठी ते इतर कर्मचा-यांसह निघून गेले. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.