Pimpri : पिंपरीत कर्मवीरांचा जयघोष, रयत संकुलातर्फे प्रभातफेरी

एमपीसी न्यूज – थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर प्रतिमेची चित्ररथातून प्रभातफेरी काढण्यात आली. शनिवारी (दि. 22) सकाळी लेझीम पथक व झांज पथकासह रयत संकुलाच्या प्रांगणातून या फेरीला सुरूवात झाली. पिंपरी कॅम्प, तपोवन मंदिर मार्गे, पिंपरी गावातून ही फेरी काढण्यात आली. “जब तक सूरज चाँद रहेगा, आण्णा आपका नाम रहेगा”, अशा गगनभेदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.

प्रथम रयत संकुलाच्या प्रांगणात कर्मवीर प्रतिमेचे पूजन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य उत्तमराव पाटील आणि कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभात फेरीस प्रारंभ करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी कर्मवीर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालयमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रचंड संख्येने प्रभात फेरीत सहभागी झाले.

“कर्मवीरांचा जयजयकार”, “रयत शिक्षण संस्थेचा विजय असो”, “जब तक सूरज चाँद रहेगा, आण्णा आपका नाम रहेगा” आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व खाऊ वाटपानंतर प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.