Pimpri : तुकोबांच्या वारीत साहित्यिकांची प्रबोधन दिंडी    

एमपीसी न्यूज – साहित्य संवर्धन समिती व पिंपरी चिंचवड साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  सलग तिसऱ्या वर्षी देहू ते आकुर्डी पायी वारी (दि. २५ जून) रामकृष्ण हरि नाम जप करीत, अध्यात्मिक काव्यपंक्तीचे वाचन करीत आणि रस्त्याच्या कडेला झाडाच्या बिया खोचून, काही झाडे लावून , तसेच झाडांवरील खिळे व इतर वस्तूंच्या विळख्यातून मुक्त करीत संपन्न होणार आहे.

संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर, संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज, साने गुरुजी, ग दि माडगूळकर, कुसुमाग्रज आदींच्या काव्याचे फलक हाती घेतलेले साहित्यिक व साहित्य रसिक वारकरी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शब्द चि आमुच्या जीवींचे जीवन। शब्दधन वाटू जनलोका। या तुकोबारायांच्या अभंगाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध होऊन ही पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिक व साहित्य रसिकांची प्रबोधन दिंडी वारीत सहभागी होणार आहे. संत साहित्य हे चिरकाल मार्गदर्शक असून त्याच्या उद्घोषासाठी दिंडीचे आयोजन केले आहे.

राजेंद्र घावटे, सुरेश कंक, राज अहेरराव, प्रा तुकाराम पाटील , सुहास घुमरे, शोभा जोशी यांनी पुढाकार घेऊन या साहित्य दिंडीचे आयोजन केले आहे. शंभर साहित्यिक व साहित्य रसिक यांचा समावेश असणारी ही दिंडी यापुढील काळात माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पुढील टप्प्यांमध्ये सुदधा सहभागी होईल. शहरातील साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी या दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतींने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.