Pune News : गांधीजींचा स्वच्छतेचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेला – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेला आहे. काल त्यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन केले. रोज एक लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्धार जाहीर केला. स्वच्छ भारताच्या दृष्टिने हा महत्त्वाचा संकल्प असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनहिताच्या योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा शुभारंभ करताना जावडेकर बोलत होते. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग समितीच्या स्वीकृत सभासद मिताली सावळेकर आणि बूथ समितीचे शहर संयोजक कुलदीप सावळेकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

जावडेकर म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी नद्या साफ करण्याचा संकल्प जाहीर केला. पुण्यात मुळा-मुठा नदी शुद्धीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. शहरातील मैला मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये मिसळला जात होता. त्यासाठी मोदी सरकारने ८०० कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मंजुर केले. ज्यावेळी मी पर्यावरणमंत्री होतो. दुर्दैवाने त्या कामामध्ये अनेक अडचणी येत गेल्या. या अडचणी आता सुटत आहेत. सर्व ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची एकच निविदा निघाली आहे. मोठ्या कंपन्यांनी सहभाग दिला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया यापुढे निर्विघ्नपणे पार पडेल असा मला विश्वास आहे.’

जावडेकर पुढे म्हणाले, ‘पुण्यामध्ये स्वच्छतेची चळवळ चांगलीच मूळ धरत आहे. एखाद्या व्यक्तीने केळे खाऊन त्याचे साल रस्त्यावर किंवा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला तर लोकच आता त्यांना अडवतात. चॉकलेटचा रॅपर सुद्धा लोक खिशात ठेवू लागलेत. हा स्वच्छतेच्या बाबतीत जनतेच्या प्रवृत्तीत झालेला बदल फार महत्त्वाचा आहे. यामुळेच स्वच्छ भारतचे स्वप्न साकार होईल. देशभरही असेच चित्र पाहायला मिळत आहे.’

गेल्या सहा वर्षांत दहा कोटीहून अधिक शौचालये निर्माण झाली. रेल्वेमध्ये सगळी टॉयलेट बायो टॉयलेट झाली. या आणि अशा सारख्या असंख्य उपक्रमांनी देशभर स्वच्छतेची चळवळ फार झपाट्याने पुढे गेली. सर्व प्रवासी आकर्षण केंद्र आणि दैनंदिन जीवनात लागणारी केंद्रही सगळी जास्त स्वच्छ व्हावी यासाठी पंतप्रधान मोदी पाठपुरावा करतात आणि त्याला जनता प्रतिसाद देत आहे. आजच्या या अनोख्या कार्यक्रमाचे फार महत्त्व आहे. संत गाडगेमहाराज यांनी सुद्धा महाराष्ट्रात स्वच्छतेचा संदेश सर्व माध्यमांतून दिला होता. असेही जावडेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, पुनीत जोशी, तुषार कुलकर्णी, मंदार रेडे, जयश्री तलेसरा, श्रीपाद गोहाड, अतुल गळंगे, डॉ. संदीप बुटाला, मिलिंद एकबोटे, रुपाली मगर, जागृती कर्णेकर, सुनिती जोशी, सरोज जोशी, मंगल शिंदे, संगीता आधवडे, विठ्ठल मानकर, समीर ताडे, जगदीश डिंगरे, अश्विनी कुलकर्णी, नीता भालेकर, वैशाली वेदपाठक, कुंदा बिडकर, रामदास गावडे, विनय सुभेदार, कल्याणी खर्डेकर, हर्षदा फरांदे, राजू येडे, सौरभ अथनिकर, नामदेव पवळ, कुणाल तोंडे, सुनील अभंगे, निलेश घोडके, शंतनु खिलारे, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.