Pimpri: नदी स्वच्छतेच्या अभियानात शहरवासियांनी सहभागी व्हावे – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती मोहिमेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकानी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशन,भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिव्हर सायक्लोथॉन’  घेण्यात येणार आहे. त्याची आढावा बैठक आज महापालिकेच्या आयुक्त कक्षामध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक तथा या मोहिमेशी निगडीत असलेल्या संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये ‘मी पाहिलेली नदी’  या विषयावर निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास प्रमाणपत्रासह सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

दोन डिसेंबर रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून मानवी साखळीच्या माध्यमातून नदी स्वच्छतेचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे, आवाहन महापौर जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.