Pune News : गर्भवती-प्रसूत महिलांचे पाण्याविना हाल

कमला नेहरु रुग्णालयातील विदारक स्थिती !

0

एमपीसी न्यूज : प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात स्वच्छतागृहांमध्ये मागील काही दिवसांपासून पाणीच येत नसल्याने या महिलांची कुचंबना होत आहे. दुसऱ्या वॉर्डातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी गेले तर या महिलांना नर्स आणि डॉक्टर हाकलवून लावत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेचे कमला नेहरु रुग्णालय गोरगरीबांसाठी आधार आहे. या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केलेली आहे. परंतु, आरोग्य विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून कमला नेहरु रुग्णालयातील रुग्णांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी करुनही रुग्णालय प्रशासन याची साधी दखलही घेत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

तक्रारदार महिलेची बहिण प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर तिचे सिझेरियन झाले. दोन-तीन दिवसांची ही ओली बाळंतिण स्वच्छतागृहात गेली असता तेथे पाणी नव्हते. त्यामुळे ती 10 नंबर वॉर्डमध्ये गेली. परंतु, तेथे कुलूप लावण्यात आलेले होते. दुसऱ्या एका वॉर्डमध्ये गेल्यावर तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या महिलेला हाकलवून लावले.  ‘तुमच्या वॉर्डात स्वच्छतागृह आहे, त्याचाच वापर करा. अन्य वॉर्डात येऊ नका.’ असे म्हणत परत पाठवून दिले. या महिलेला चौथ्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहापर्यंत चढून जावे लागले.

असाच काहीसा अनुभव नुकत्याच दाखल झालेल्या आणखी एका गरोदर महिलेला आला आहे. ही महिला अद्याप प्रसुत झालेली नसली तरी तिचे दिवस भरलेले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. परंतु, या अवघडलेल्या अवस्थेतील महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी मात्र असंवेदनशीलपणाची वागणूक देत आहेत.

महिलांसह अन्य रुग्णांना स्वच्छतागृहासह अंघोळीसाठी पाणी मिळत नसल्याने नातेवाईक आरडाओरडा करीत आहेत. परंतु, त्यांच्या उद्विगनतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे कारण देण्यात येते आहे. तक्रार करण्यास गेले तर ‘कोणाकडे तक्रार करायची ती करा’ असेही सुनावले जात आहे. या संदर्भात पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे यांनी पाणी व्यवस्थेसह अन्य दुरावस्था दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.