Pimpri: पाणी गळती रोखा, पाणीपुरवठा सुरळीत करा; महापौरांचे आदेश 

एमपीसी न्यूज – पवना धरणातून शहरवासियांना दररोज केल्या जाणा-या पाणीपुरवठ्यापैकी 20 टक्के म्हणजेच 100 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण जास्त असून पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करा. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा, नागरिकांच्या तक्रारीचे निराकण कराव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच तक्रारीच येऊ नयेत अशा कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर राहूल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर दालनात आज (मंगळवारी) बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेविका भीमाबाई फुगे, नगरसेवक तुषार कामठे, सागर गवळी, सहशहर अभियंता अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

‘क’ आणि ‘इ’ प्रभाग कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी तुलनेत अधिक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली. चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या कामाचा सर्व्हे चालू आहे. प्रत्येक भागाची लोकसंख्या, भविष्यातील लोकसंख्या याचा विचार करुन सन 2041 ची लोकसंख्या विचारात घेऊन डिझाईन केले जात आहे. पाईपलाईन बंदलण्याचे काम चालू आहे. पावसाळा असल्याने काम संथ गतीने सुरु आहे, असे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी सांगितले.

त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर जाधव म्हणाले,  चिखली, जाधववाडी, वाकड आणि इतर भागांत सात ते आठ पाण्याच्या टाक्‍या (जलकुंभ) उभारण्याच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच या जलकुंभांचे काम सुरु केले जाईल.  भामा-आसखेड व आंद्रा धरणातील राखीव कोटा असलेले पाणी शहराला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याकरिता आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाणारे पाणी देहू बंधा-यातून उचलून ते चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पात आणण्यात येणार आहे. तेथून त्या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.