Pimpri News : पेट्रोल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, रिक्षाची भाडेवाढ कधी ?

रिक्षा चालक आणि संघटनांचा सवाल

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. खाद्य पदार्थांपासून ते दैनंदिन लागणाऱ्या वस्तू पर्यंत गेल्या आठ वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांची महागाई 8.38 टक्के झाली आहे. त्यातच रेपोदरात 0.40 टक्के वाढ झाली. मागील वर्षी मे महिन्यात पेट्रोल दर 78 रुपये होता, आता 122 वर गेला आहे, तर सीएनजी गॅस 62 रुपये होता आता 77.20 रुपये झाला आहे.

सर्व वस्तू व सेवांचे दर वाढत आहेत मात्र आमच्या रिक्षाचालकांचे भाडेवाढ कधी होणार, असा सवाल कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व सारथी चालक-मालक महासंघाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

पिंपरी येथे झालेल्या बैठकीसाठी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक राम बिरादार समाजिक कार्यकर्ते नाना कसबे, महादेव सोनवणे, अनंत कदम, आतिश वडमारे, बबन हिवाळे, मार्तंड कांबळे, राजकारण पटेल, ओमप्रकाश मोरया, विशाल रिटे आणि रिक्षाचालक उपस्थित होते. रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

नखाते म्हणाले, महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लाखो कुटुंबांना महागाईचा तडाखा बसला असून केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच रिक्षाचालकांना परतीचे भाडे मिळत नाही. बस, ट्रॅव्हल, टूरिस्ट असो वा रेल्वे यांचे प्रवासी दर वाढवण्यात आले. मात्र रिक्षाचालकांचे अजूनही दर वाढवण्यात आले नाहीत. यासाठी आरटीओ व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

दिड वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीपासून रिक्षाचालकांचे अनेक हप्ते, देणी थकलेले आहेत. स्वतः कमवून हे सगळं कर्जफेड आणि कुटुंब चालवायचे अशा दुहेरी अडचणीतून रिक्षाचालक जात असताना त्यांना भाडेवाढ होणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने त्यांच्या मीटर दरवाढ होणे गरजेचे आहे. सध्याचे मीटरचे दर पहिल्या दीड किलोमीटर 21 रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरला 14 रुपये आहे. राज्य परिवहन खात्याने महागाई निर्देशांकाप्रमाणे रिक्षाचालकांची भाडेवाढ निश्चित करावी, असेही नखाते म्हणाले.

प्रस्तावना राजेश माने यांनी केली. सूत्रसंचालन मधुकर वाघ यांनी केले. आभार सुरेश भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.