Pimpri : पंतप्रधानांची सभा;  डॉ. अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली;  शहरातील सभा रद्द

पक्षाच्या सभेला आलेल्या पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणे कितपत योग्य? - डॉ. कोल्हे

एमपीसी न्यूज –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात भाजप उमेदवारांसाठी सभा असल्याने ‘प्रोटोकॉलमुळे’ राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील सभा रद्द झाल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या सभेला आलेल्या पंतप्रधानांच्या  प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणे हे कितपत लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्याला धरून आहे?, असा सवाल डॉ. कोल्हे यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा होत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरस्कृत उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार होत्या. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पाईट, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील सभा रद्द झाल्या आहेत.

याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोल्हे यांनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परिणामी, पाईट, भोसरी, चिंचवड आणि पिंपरीच्या सभेला येऊ शकलो नाही. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील. तर, त्या ‘प्रोटोकॉल’मुळे इतर पक्षांना वंचित ठेवण्यात येत आहे. प्रचार करणे नाकारले जात आहे. हे कितपत लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्याला धरुन आहे. या विषयी संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.