Pune : तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणा-या दुकानावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैधरित्या विक्री करणा-या एका दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

साजीद शेख हसन (वय 40, रा. मेफेर ग्रेस,न्यु मोदीखाना, कॅम्प, पुणे), असे या ताब्यात घेण्यात आलेल्या दुकान चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (पुर्व) पोलीस उपनिरीक्षक तागड हे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कॅम्पातील कुरेशी मशीद जवळील बिस्मा एंटरप्रायझेस, शॉप नं. 04, या दुकानातून अवैधरित्या तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे तागड यांनी पोलीस कर्मचा-यांसह बिस्मा एंटरप्रायजेस येथे छापा टाकला असता दुकानातून एक लाख 52 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तर दुकान चालक साजीद शेख हसन याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. लष्कर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.