Pimpri : आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीचा धमाका, आयत्यावेळी 323 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने धमाका केला आहे. आयत्यावेळी तब्बल 323 कोटी 32 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत स्थायी समितीने इतिहास रचला आहे. एकूण 330 कोटी 95 लाख रुपयांच्या 92 विषयांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये पीएमपीएमलला संचलन तूट, एलएडी दिवे बसविणे, नदी सुधार, अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते, स्थापत्य विषयक कामे, व्यायामशाळा बांधणे असा विविध कामांचा समावेश आहे.

आचारसंहितेच्या धास्तीने स्थायी समितीचा सभा घेण्याचा धडाका चालू आहे. मागील दोन आठवड्यात एकूण सहा सभा पार पडल्या. आज (बुधवारी) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होती. या सभेत विषयपत्रिकेवरील सात कोटी 56 लाख रुपयांच्या दहा विषयांना मान्यता देण्यात आली.

व्यायामशाळेचे 13 विषय आठ आठवड्यांसाठी तहकूब ठेवले. पूरग्रस्त महिलांना बेडशीट संच वापरण्याचा विषय सहा आठवडे तहकूब केला आहे. तर, महापालिकेच्या बालवाड्यांच्या भिंती थ्रीडी पेंटींगद्वारे बोलक्या करण्याचा आणि भोसरीतील नवीन रुग्णालय आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा विषय प्रशासनाने मागे घेतला आहे. तर, आयत्यावेळी 323 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली.

या कामांना दिली मान्यता!

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील पवना आणि इंद्रायणी नदी पुर्नरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना नदीसाठी (96 कोटी 81 लाख), इंद्रायणी नदीसाठी (47 कोटी 62 लाख), भोसरीतील जिजामाता उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याच्या अर्बन स्ट्रीटसाठी (31 कोटी 3 लाख 81 हजार), क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठ्याची (बिले 27 कोटी 27 लाख), एलईडी दिवे बसविण्यासाठी (34 कोटी), प्रभाग दोन बो-हाडेवाडीतील रस्ते विकसित करणे (पाच कोटी), प्रभाग क्रमांक 15 मधील राममंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी (एक कोटी), काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील चर दुरस्ती करणे (चार कोटी), पिंपळेगुरव येथील सुदर्शननगर परिसरातील रस्ते अद्यावत पद्धतीने विकसित करणे (10 कोटी 28 लाख), गुलमोहर कॉलनीतील रस्ते विकसित करणे (10 कोटी 35 लाख), सांगवी किवळे रस्त्यावरील राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चौक पर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण (तीन कोटी), पिंपरी ते दापोडी सेवा रस्त्याचे पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण (दोन कोटी 77 लाख), निगडी ते पिंपरी ( दोन कोटी 75 लाख),

सांगवी किवळे रस्त्यावरील डांगे चौक ते मुकाई चौक पर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण करणे (दोन कोटी 69 लाख), प्रभाग क्रमांक 2 मधील सावतामाळी उद्यानात व्यायामशाळा बांधणे (तीन कोटी 25 लाख), प्रभाग क्रमांक 26 मध्ये सिमेंट काँक्रीटीकरण करणे ( दोन कोटी 9 लाख), प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथे बॅडमिंटन परिसरात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करणे ( एक कोटी 44 लाख), च-होलीत उद्यान विकसित करणे ( एक कोटी 43 लाख), प्रभाग क्रमांक सहा भगतवस्ती, गुळवेवस्ती पेव्हींग ब्लॉकची कामे (24 लाख), स्थापत्य विषय कामासाठी (25 लाख), प्रभाग क्रमांक दोन महापालिका इमारती सार्वजनिक शौलाचय, शाळांची दुरुस्ती (19 लाख), ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते रुंदीकरण करणे (33 लाख),

दोन आठवड्यात साडेआठशे कोटींचे प्रस्ताव मंजूर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या धास्तीने स्थायी समितीने सभांचा सपाटा लावला आहे. मागील दोन आठवड्यात एकूण सहा सभा पार पडल्या. त्यात तीन विशेष सभांचा समावेश होता. या सभांमध्ये सुमारे साडेआठशे कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. साप्ताहिक सभांना आयत्यावेळच्या प्रस्तावाद्वारे कोट्यावधी खर्चाचे प्रस्ताव मागील दराने मंजूर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.