Pune News : खासगी सावकाराकडून पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी, पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : मित्र असलेल्या खासगी सावकाराने फ्लॅट खरेदी करण्यासाठी व्याजाने घेतलेल्या पैशासाठी पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्यानंतर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी गावात हा प्रकार घडला. 

सचिन काळभोर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खाजगी सावकार सुहास ननावरे (धायरी) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामिनी सचिन काळभोर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सचिन काळभोर आणि सुहास ननावरे मित्र होते. सचिन काळभोर यांनी फ्लॅट खरेदी करण्यासाठी सुहास ननावरे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. या बदल्यात तो वेळोवेळी दर महिन्याला पन्नास हजार रुपये व्याज देखील देत होता.

मात्र आणखी जास्त पैसे मिळावेत यासाठी आरोपी सचिन काळभोर याला शिवीगाळ करत मानसिक त्रास द्यायचा. तसेच जास्तीचे पैसे नाही दिले तर मुलाबाळांना आणि बायकोला रस्त्यावर आणील अशी धमकी देखील त्याने दिली होती. सुहास ननावरे च्या याच त्रासाला कंटाळून सचिन काळभोर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.