Chinchwad : बिर्ला रुग्णालयाचा सर्व स्तरातून निषेध

एमपीसी न्यूज – धर्मदाय कार्यालयाअंतर्गत असणार्‍या आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार देण्याबाबत उदासिनता, उपचार नाकारणे, रुग्णांची हेळसांड करणे रुग्णांना डांबून ठेवणे अशा विविध गैरप्रकारांविरोधात धर्मदाय रुग्णालय संघर्ष समिती, सर्व समावेशक पक्ष संघटनांनी आज (गुरुवारी) जाहीर निषेध करुन धरणे आंदोलन केले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सतीश काळे, स्वराज्य अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, धनाजी पाटील, दीपक कांबळे, प्रमोद साळवे, व्यंकट मानवे, प्रमोद शिंदे, राजू गोरे,  नवनाथ लांडगे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मदाय रुग्णालयाची सविस्तर माहिती व आजवर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडलेल्या अन्याय अत्याचारांची उजळणी केली. महिला, पुरुष व लहान बालके यांना रुग्णालयाकडून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांचे मानसिक व शारिरीक खच्चीकरण होत आहे. ही बाब गंभीर असल्याने रुग्णालयावर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावर योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा सर्व समावेशक कार्यकर्त्यांनी दिला. तसेच रुग्णालयाच्या नावापुढे धर्मदाय रुग्णालय असा उल्लेख करावा, प्रवेशव्दारावर स्वतंत्र कार्यालय व समाजसेवक २४ तास उपलब्ध असावा. निर्धन आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार सेवा देण्यात यावी. योजनांच्या सोयीसुविधांचा फलक स्पष्ट लिहावा. धर्मदाय व योजनेतून लाभ घेण्याकरिता रुग्णाला आवश्यक कागदपत्रे पूर्तता, नियम अटी सूचना फलक स्पष्ट प्रवेशव्दारावर लावावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.