pune : भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शहर भाजपकडून निषेध

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खासदार संजय काकडे यांनी केलेल्या विधानाचे शहर भाजपमध्ये उमटल्याचे पाहावयास मिळाले असून भाजपची कार्यपध्दतीची माहिती नसावी म्हणून संजय काकडे हे बेजबाबदारपणे विधाने करीत आहेत. त्यांची विधाने पक्ष संघटनेच्या विरोधातील आणि पक्षहिताला बाधा आणणारी आहेत.

राजकीय विधान करताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. अशा शब्दात भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रक काढून निषेध नोंदवला.

या पत्रकात असे म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीची निश्‍चित ध्येयधोरणे आणि संघटनात्मक कार्यप्रणाली आहे. संघटनेच्या महत्वाच्या बैठकीला कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, याबाबत संघटना पातळीवर निर्णय घेतले जातात.

काकडे यांना या कार्यपध्दतीची माहिती नसावी, म्हणून ते बेजबाबदारपणे विधाने करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार आणि पुणे महापालिकेतील सर्व भाजपच्या नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे, असे गोगावले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. आता शहर भाजपकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रकाला संजय काकडे काय उत्तर देतात, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.