Pimpri : विरोधकांचा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला विरोध, सत्ताधा-यांचे समर्थन, पाणीकपातीवर महासभेत शिक्कामोर्तब

पाणी प्रश्नावर चार तास चर्चा  

एमपीसी न्यूज – एक दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळे शहरवासियांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेने दिवसाआड पाणीकपातीला जोरदार विरोध केला. तर, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोधकांचा विरोध डावलून आयुक्तांच्या पाणीकपातीच्या निर्णयाचे समर्थन केले. भविष्यातील 25 वर्षाचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत 25 नोव्हेंबरपासून शहरात दिवसाआड पाणी देण्याच्या आयुक्तांच्या निर्णायावर महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब आणि नोव्हेंबर महिन्याची नियमित महासभा आज (बुधवारी) झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका प्रशासनाने सोमवारपासून एक दिवसाआड पाणीकपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर महासभेत चार तास चर्चा झाली. 24 नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला.

राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी चर्चेला सुरुवात केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नाकर्तेपणामुळे शहरवासियांवर पाणीकपात लादली आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, मागील पंचवार्षिकमध्ये पाणी कपात नव्हती. परंतु, दोन वर्षांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली काम करुन, असे चुकीचे निर्णय घेऊ नयेत.

भाजपचे अंबरनाथ कांबळे म्हणाले, चोवीस तास योजनेसाठी केवळ कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. अधिकारी नगरसेवकांना वेड्यात काढत आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांचे दालन पाण्याच्या टाकीखाली करावे. राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके, शिवसेनेच्या अश्विनी वाघमारे यांनी पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. भाजपचे संदीप कस्पटे म्हणाले, नियमितपणे कराचा भरणा करणा-या सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा. राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, 40 टक्क्यापैकी किती पाण्याची गळती थांबवली. पवना धरणातून पाणी आरक्षण वाढवावे.

शिवसेनेचे सचिन भोसले म्हणाले, प्रशासनाने सुरळित पाणीपुरवठ्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. नागरिकांनी पाणीपट्टी भरु नये. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे म्हणाले, दापोडीत सहा महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, भाजपची सत्ता आल्यापासून पाण्याची बोंब झाली आहे. अधिका-यांनी भाजपची सुपारी घेतली आहे का?

राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, पाणी गळती, पम्पिंग या विषयी वर्षानुवर्षे अधिकारी तीच रडगाणे गात आहेत. गेल्या 15 वर्षांत अनेक उपाययोजना, प्रकल्प आणले गेले. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने आज पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आयुक्तांनी पाणी कपात केली. तर, त्यांना मोठा अपमान सहन करायची तयारी ठेवावी.

आगामी काळात पाणी प्रश्नच शहराची राजकीय दिशा ठरवेल असे सीमा सावळे म्हणाल्या. पाणी कपातीला प्रशासन जबाबदार, असे भाजपचे शत्रुघ्न काटे म्हणाले. आशा शेंडगे, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, संगीता ताम्हाणे, नितीन काळजे, झामाबाई बारणे, संतोष लोंढे, जावेद शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.