_MPC_DIR_MPU_III

Pimpri: ‘सणासुदीच्या काळात शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करा’

आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना सणासुदीच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यासाठी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. 

_MPC_DIR_MPU_IV

गेल्या महिनाभरापासून शहराला अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारी येऊनही हा प्रश्न सुटत नसल्याने आमदार जगताप यांनी आज (सोमवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात ही बैठक झाली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विलास मडिगेरी, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

आंद्रा तसेच भामा-आसखेड धरणातून मंजूर झालेला सुमारे 149  दशलक्ष घनमीटर पाण्याचा कोटा पिंपरी-चिंचवड शहरात आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तातडीने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी अशी सूचना आमदार जगताप यांनी आयुक्तांना केली. दोन तास चाललेल्या या बैठकीत शहराला पाण्याचा पुरवठा कमी का होतो, याची त्यांनी अधिका-यांकडून माहिती घेतली.  पवना धरणात पुरेसे पाणी असूनही  शहरात अनियमित पाणीपुरवठा का होत आहे?, अपु-या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाच्या नियोजनाअभावी नगरसेवकांना त्रास होत असेल. तर, आयुक्त म्हणून आपण स्वतः त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यायला हवी. आता दिवाळी तोंडावर आली आहे. शहरवासीयांना पिण्याचे पाणी कमी पडता कामा नये. पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी डोळ्यात तेल घालून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो की नाही याची दररोज माहिती घ्यावी. जेथे पाणी येत नाही, तेथे आवश्यक त्या उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे, असे निर्देश आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिले आहेत

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.