Pimpri News: शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासींयाची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरल्याने मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (सोमवारी) जलपूजन करण्यात आले.

वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असतानाही महापालिका प्रशासन, सत्ताधा-यांच्या गलथान कारभारामुळेच शहरवासीयांना आजदेखील दररोज, पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. काही भागात तर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दररोज पाणी देऊ शकत नसताना चोवीस तास पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो आणि करदात्यांच्या पैशांचे नुकसान केले जाते हे मोठे दुर्दैव आहे, असे खासदार बारणे म्हणाले.

शहरवासीयांना दिवसातून एकदा पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी खासदार बारणे केली. काल धरण शंभर टक्के भरले होते. आज धरणात 98 टक्के पाणीसाठा आहे. शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपअभियंता अशोक शेटे, सुरेश गायकवाड, सुनील हगवणे, धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रसाळ, उमेश दहीभाते, सुरेश गुप्ता, मदन शेडगे, अनिल भालेराव, शंकर दळवी, छगन काळे, अमित ठाकर या वेळी उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. 6 एमएलडीपेक्षा अधिकचे पाणी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते. शहराच्या पाणी पुरवठ्याचे पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील सहा वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांच्या वतीने धरणातील गाळ काढला जातो. त्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली. गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणीसंकट टळले. काही वर्षांपूर्वी दोन दिवसाआड पाणी मिळत होते. परंतु, गाळ काढल्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली असून शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पवना धरणात पाणीसाठा मुबलक आहे. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असतानाही महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना आजदेखील पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. चोवीस बाय सात, अमृत योजनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु, पाणी समस्या काही संपत नाही. काही भागात जास्त, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याच्या एवढा योजना राबवूनही काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आजही शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. याचाच अर्थ महापालिकेचे नियोजन चुकत आहे. ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे”.

”आजदेखील 30 टक्क्यांच्यावर पाणी गळती होते. सगळ्या योजना राबवून आणि कोट्यवधी रुपये खर्च करुनही प्रशासनाला पाणी गळती रोखता आली नाही. यात प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधा-यांचे देखील अपयश आहे. शहरवासीयांना दिवसातून एकदा पाणी मिळाले पाहिजे. महापालिका जेवढे पाणी उचलते. तेवढे पाणी शहरवासीयांना पुरेसे होऊ शकते. परंतु, नियोजनाचा अभाव दिसून येत आहे” असेही खासदार बारणे म्हणाले.

राज्य सरकार आणि धरणग्रस्तांची संयुक्त बैठक

धरणग्रस्त नागरिकांची यावेळी खासदार बारणे यांची भेट घेतली. त्यांचे प्रश्न मांडले. ”पवना कालवा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात पवना धरणग्रस्तांचा प्रश्न उपस्थित केला. 50 वर्षे झाले तरी, शेतक-यांच्या समस्या मार्गी लागल्या नाहीत. त्याच परिसरात शेतकरी जागा मागत आहेत. शासन एक एकर जागा देण्यास तयार आहे. याबाबत राज्य सरकार आणि धरणग्रस्तांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे” खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.