Pune : कॅन्टोन्मेट बोर्डांना वाढीव विकासनिधी द्या – खासदार गिरीश बापट यांची मागणी

एमपीसी न्यूज – देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व व्यवस्थापनांना अधिक विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी नवीे दिल्ली येथे केली. खासदार बापट व खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने  संरक्षण मंत्री राजनाथसिंह व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. त्यावेळी बापट यांनी वरील मागणी केली.

कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारित येणाऱ्या देशभरातील सर्व  खासदारांची बैठक बोलवावी व कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्नांची त्यात चर्चा करावी, अशी सूचनाही बापट यांनी या भेटी दरम्यान केली. देहूरोड कॅन्टोन्मेंटचा सुमारे 225 कोटी रुपयांचा सेवानिधी केंद्राकडे थकित आहे. ती रक्कम लवकरात लवकर द्यावी. याकडेही बापट यांनी लक्ष वेधले. यावेळी  देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळराव तंतरपाळे, अमोल नाईकनवरे उपस्थित होते.

तर, देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारच्या बांधकाम आराखड्याला विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी. संरक्षण खात्याच्या मालकीच्या जमीनीवरील बोर्डाच्या शाळा व इतर मिळकतींचे हस्तांतर प्रस्ताव मंजूर करावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मतदार यादीतून कमी केलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत. या मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहिती बापट यांनी पत्रकारांना दिली. खासदार बारणे यांनीही या संदर्भातील निवेदन दिले. येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकारी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष, नगरसेवक यांची बैठक बोलाविण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिल्याचेही बापट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.