Pimpri News : चिखली, तळवडे परिसरात दररोज शुद्ध पाणीपुरवठा करा 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे मागणी 

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 85 टक्के  भरलेले आहे. तरीही पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, तळवडे परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा का होतो ?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित  केला आहे. 

चिखली, तळवडे परिसरातील विस्कळीत व गढूळ पाणीपुरवठ्यासंदर्भात शिवसेनेचे शहर संघटक रावसाहेब थोरात, माजी उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता  प्रवीण लडकत यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देत दररोज पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी  केली. यावेळी दादा नरळे, संजय गाढवे, वैभव थोरात उपस्थित होते.

काशीद आणि थोरात म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून चिखली, मोरेवस्ती, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, रुपीनगर आणि तळवडे परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नोकरदार महिला आणि पुरुषांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

शिवाय या भागात सध्या गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. याकामी पाणीपुरवठा विभाग नियोजनात कमी पडताना दिसत आहे. यापुढे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून चिखली, तळवडे परिसरात  दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी काशीद आणि थोरात यांनी  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.