Pune News : बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षणाची तरतूद उपयुक्त ठरेल – डॉ. वसंत काळपांडे 

Provision of multidisciplinary, interdisciplinary education would be useful-Dr. Vasant Kalpande

0

एमपीसी न्यूज – नव्या शैक्षणिक धोरणात विज्ञान, कला, वाणिज्य, शालेय, अभ्यासक्रमेतर अशा भिंती पुसट झाल्या आहेत. बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण घेण्याची मुभा यामध्ये आहे. शालेय स्तरापासूनच व्यावसायीक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न परिणामकारक वाटतो, असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे ‘नवीन शैक्षणिक धोरणात विज्ञानाचे स्थान’ यावर आयोजित परिसंवादात काळपांडे बोलत होते.

गुगल मीटद्वारे झालेल्या या परिसंवादावेळी महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. बाळकृष्ण बोकील, ज्येष्ठ पत्रकार श्रीधर लोणी, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, माजी अध्यक्ष विनय आर. आर, अशोक तातुगडे, शशी भाटे, नीता शहा, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.

प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रास्ताविक केले. विनय आर. आर. यांनी सूत्रसंचालन केले. परिसंवादाचे समन्वयन अशोक तातुगडे यांनी केले.

डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, “भारतीय ज्ञान, परंपरा, प्राचीन वारसा, मूल्ये यासह गणिती, संगणकशास्त्र, माहितीशास्त्र आणि कौशल्यविकास हा नव्या शिक्षणपद्धतीचा आधार आहे. वाचनावर भर, विद्यार्थीकेंद्री असे याचे स्वरूप आहे. विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी विशेष उपाय यामध्ये करण्यात आलेले आहेत. विज्ञानविषयक उपक्रम, खेळ, विशेष दिवसांचे आयोजन, स्पर्धा, ऑलिम्पियाड अशा गोष्टींचा समावेश केला आहे. विज्ञानविषयक साहित्याचे वाचन याचाही समावेश आहे. स्वअध्ययनासह सहअध्ययनाचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी याचे ध्येय ठेवले आहे.”

डॉ. बाळकृष्ण बोकील म्हणाले, “सगळ्या शास्त्रांचा विचार या शैक्षणिक धोरणात केला आहे. कृतिशील आणि अनुभवातून शिक्षण, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव हा शिक्षणाचा गाभा आहे. त्याचबरोबर सर्वंकष मूल्यमापन आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाची मांडणी या धोरणात आहे. सर्जनात्मक शिक्षण पद्धती, मूल्यमापन पद्धती विकसित करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर दिली आहे. त्यामुळे त्यांना उपक्रमशील बनावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाभिमुख शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आधी तसे घडवणे गरजेचे आहे.”

श्रीधर लोणी म्हणाले, “हे धोरण नवा विचार मांडणारे असले, तरी फार आमूलाग्र बदल घडवून आणेल असे वाटत नाही. पायाभूत सुविधा, शिक्षकांत वैज्ञानिक वृत्ती, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाभिमुख दृष्टीकोन रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न दिसत नाहीत. बहुशाखीय विद्याशाखा आणि सर्वांगीण विकास याचा अंतर्भाव यात आहे. मात्र, मूलभूत विज्ञानाबद्दल किंवा पायाभूत सुविधांच्या उभारणीबद्दल फारसे समाधानकारक दिसत नाही. विद्यापीठांमधून संशोधनांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.