Psychological barrier – मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे – समीर विद्वांस

Mental health should be talked about openly - Sameer Vidwans

एमपीसीन्यूज : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने अनेक प्रश्न समोर आणले आहेत. त्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आपल्याकडे मानसिक आजारांविषयी बोलणे कमी प्रतीचे मानले जाते. मात्र, ज्याला आपण सर्व सुखे पायाशी लोळण घेत आहेत अशी परिस्थिती असताना देखील एखाद्याला जीवन सहजगत्या संपवावे असे वाटते, त्यावेळी त्याच्या मानसिक आंदोलनांचा विचार केला गेलेला नसतो. सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘धुरळा’चा दिग्दर्शक समीर विद्वांसनं मानसिक आरोग्याविषयी लोकांना जागं करणारी पोस्ट लिहिली आहे.

वरकरणी सगळं गुडी गुडी वाटत असताना एखाद्याला आपले जीवन संपवावे असे का बरे वाटते? याच मुद्यावर समीर विद्वांसनं पोस्ट ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काही घडलं वा घडलं नाही तरच नैराश्य येतं हा खूप मूर्ख गैरसमज आहे. नैराश्य हा मनाचा आजार आहे.

जसं पोट दुखतं, ताप येतो तसंच मनही दुखतं. मनालाही ताप येतो. ते मान्य करायला लाजू नका. ते मान्य करणाऱ्याला हिणवू नका. प्लीज, जसा फॅमिली डॉक्टर असतो, तसा मनाचाही फॅमिली डॉक्टर असायलाच हवा’.

‘नैराश्य येणं कमीपणाचं नाहीये. अजिबातच ! ऐहिक सुखाचा, आत्मसन्मानाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मला हे सांगताना अजिबात लाज वाटत नाही की, मीही नैराश्यावर औषध, थेरपी घेऊन मात केलीय.

औषध, थेरपी संपली पण, समुपदेशन घेत होतो आणि घेत राहीन. कारण त्याने माझं मन सुदृढ राहतं’, असं समीरनं म्हटलं आहे.

‘मानसिक आरोग्याविषयी जास्तीत जास्त मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. सायकॅट्रिस्टकडे फक्त वेडी माणसं जातात हा अडाण** समज मनातून (विशेषतः मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय) निघून जाईल, त्या दिवशी खूप प्रश्न सुटायला मदत होईल.

लक्षणं ओळखणं ही कुटुंबाची आणि जवळच्या लोकांचीही जबाबदारी आहे’, असं विद्वांसनं आपल्या पोस्टमधून लोकांना सुनावलं आहे.

आपल्या चित्रपटातून लोकांना सकारात्मक संदेश देणारा समीर मानसिक आरोग्यावर खूपच मोकळेपणाने व्यक्त झाला. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर समीरनं त्यावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

‘२०२० साल थांबायचं नावच घेत नाहीये! एकामागून एक भयंकर घटना चालूच आहेत! सुशांत सिंग रजपूतची बातमी प्रचंड धक्कादायक आहे’, असं समीरनं म्हटलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.