Pune : थुंकीबहाद्दरांना महापालिकेचा हिसका…

एमपीसी न्यूज – तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन जागोजागी पिचकाऱ्या उडविणाऱ्यांवर महापालिकेची पथके लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर अथवा भिंतींवर थुंकीचे शिंतोडे उडविणाऱ्याना जागेवरच दीडशे रुपये दंड आकारायला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, रस्त्यावर थुंकणाऱ्या १६० जणांवर गेल्या आठ दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तसेच त्यांच्याकडून त्यांनी केलेली घाण जागेवरच साफ करून घेतली जात आहे. 
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका अथवा शौच केल्यास जागेवरच दंड (स्पॉट फाइन) आकारायला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दोन नोव्हेंबरपासून विभागस्तरावर एक आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक अशी एकूण सोळा पथके तैनात केली आहेत. या पथकांनी दोन नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वचक निर्माण होत आहे. या कारवाईची माहिती देण्यासाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी नोटीसही जाहीर केली असून, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही नमूद करण्यात आली आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कृती दंडाची रक्कम

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे – १५० रुपये
रस्ते, मार्गांवर घाण करणे – १८० रुपये
उघड्यावर लघुशंका करणे – २०० रुपये
उघड्यावर शौच करणे – २०० रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.