Talegaon Dabhade News : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच झाले. वारकरी संप्रदायाचे विचार या दिनदर्शिकेच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. नवलाख उंबरे येथे एकनाथ शेटे यांच्या निवासस्थानी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व मंडळाची मासिक बैठक झाली. यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा गेल्या महिनाभरापासून नवलाख उंबरे येथे नियोजित असलेला संकल्प मेळावा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने रद्द करण्यात आला.

परंतु, मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या माध्यमातून छापण्यात आलेल्या हजारो कॅलेंडरचे वितरण हे सर्व ग्रामप्रतिनिधी व सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते, त्यामुळेच शासनाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करून अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत नवलाख उंबरे येथे श्री. एकनाथ शेटे यांच्या निवासस्थानी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व मंडळाची मासिक बैठक अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाली.

मंडळाचे आधारस्तंभ ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी व्यास,गुरूवर्य ह.भ.प. शंकर महाराज मराठे( भामचंद्र निवासी), ह.भ.प.स्वामी निरंजनानंद सरस्वती महाराज, मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार भसे, माजी उपसरपंच एकनाथ शेटे यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत दिनदर्शिका प्रकाशन अतिशय उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख उपस्थित होेते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्वांनी मंडळाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रामदास पडवळ यांनी केले. स्वागत एकनाथ शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप वावरे यांनी केले. आभार सागर एकनाथ शेटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.