Pune News : शिव-चरित्र-साहित्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज ग्रंथांचे प्रकाशन संपन्न

एमपीसी न्यूज – शिवचरित्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना “शिवचरित्र साहित्य खंड-5” हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे असे ज्येष्ठ इतिहास तज्ञ आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी आज येथे सांगितले. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर आणि भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या विद्यमाने पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित “महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज – सन 1500 ते 1800” या ग्रंथाचे देखील प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर मंडळाचे विश्वस्त प्रदीप रावत, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, डॉ. प्रमोद जोगळेकर, डॉ. अनुराधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बलकवडे म्हणाले की, या ग्रंथाचे नव्याने प्रकाशन करण्यात आले आहे. याआधी 1942 मध्ये ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्यात 87 लेख होते. या खंडात मोडी लिपीतील दोन छायाचित्रे असून त्यावेळचे समाज जीवन, आर्थिक, राजकीय, स्थिती बाबतची कागदपत्रे आहेत. कागदपत्रांचे संदर्भ देण्यात आले आहेत. त्यामुळे अभ्यासकांना नक्कीच ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ कुलकर्णी यांनी सांगितले की, ग्रंथाच्या निमित्ताने त्या काळात होणाऱ्या सभा, बैठका, त्यावेळची चर्चा, प्रश्नोत्तरे, कागदपत्रे यांचा अभ्यास करता आला. त्यातून ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

श्री. रावत यांनी सांगितले की, दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन प्रकाशनाचा प्रकल्प हाती घेतला तो आज पूर्ण झाला आहे. यापुढील काळात विविध पुस्तकांची प्रकाशने केली जाणार असून त्यासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच विविध संशोधन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.

प्रारंभी जोगळेकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले. स्नेहा सप्रे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.