Pimpri : नम्रतेमुळे माणसाला मोठेपणा मिळतो आणि पुण्य वाढते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज – मार्दव म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे. सर्व थोर माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीर यांच्यापर्यंत सर्वजण  अती मृदू आणि नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपणा तर देतेच; शिवाय नम्रतेमुळे पुण्यही लाभते असे मत पुलकसागर महाराज यांनी निगडी येथे व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने दशलक्षण पर्व महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवात दुस-या दिवशी मार्गदर्शन करताना  उत्तम  मार्दव यावर पुलकसागर महाराज बोलत होते. 

तत्पूर्वी सकाळी पर्युषण पर्वाचे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी भगवान महावीर यांच्या  मूर्तीला अभिषेक  करण्यात आला. यावेळी सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, मिलिंद फंडे, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे आदी उपस्थित होते.

पुलकसागर महाराज पुढे म्हणाले, ” अहंकाराची हवा मिळाली तर अहंकारातच माणूस नष्ट होऊन जातो. आयुष्यात जे मिळाले त्यातच आनंद उपभोगा. आयुष्य खूप छोटे आहे. ते आनंदी व हास्याने जगले तरच उत्तम मार्दवता मिळून आयुष्यात आनंद मिळेल. कर्तृत्वाची पराकाष्ठा करावयाची, यश प्राप्त करावयाचे परंतु यशाची पताका मिरवायची नाही. न बोलता समर्पणाच्या समाधानात संतुष्ट राहावयाचे हा खरा मार्ग असतो. हा कष्टसाध्य मार्ग ज्यांनी साधला त्यांच्या सुखाला कशानेही कमीपणा येत नाही” असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.