Punawale News : बिल्डरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईस टाळाटाळ का?

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – गोरगरीबांनी पोटपाण्यासाठी उभारलेल्या (Punawale News)  टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्याबाबत तत्पर असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन बिल्डर मंडळींकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. महापालिकेच्या या दुटप्पी आणि बिल्डरधार्जिण्या भूमिकेच्या निषेधार्थ संबंधित अनधिकृत बांधकामासमोर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही नाईक यांनी दिला आहे. 

 

 

यासंदर्भात नाईक यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1 अ आणि  40/2/2 अ मिळकतीमध्ये पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे. हे तत्काळ बांधकाम पाडून टाकावे अशी मागणी एका जागरुक नागरिकाने पालिकेकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने संबंधित अनधिकृत बांधकामाकडे केलेले दुर्लक्ष संशयास्पद आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

 

याबाबत एक जागरुक नागरिकाने महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांना निवेदन दिले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पालिका बांधकाम परवाना विभागातील बीट निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अनधिकृत बांधकाम झाल्यावर त्यावर कारवाईसाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केला जातो. त्यामुळे सुरुवातीलाच अनाधिकृत बांधकाम होवू नये, याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. पण, तसे होताना दिसत नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

 

Pimpri News : पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्यावतीने श्रीरंग बारणे यांना देण्यात आले गुणवंत कामगारांच्या मागणीचे पत्र

 

अनधिकृतपणे होणा-या बांधकामामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. याचेही प्रशासनाला काही सोयरसुतक दिसत नाही. महापालिकेच्या हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1 अ आणि  40/2/2 अ मिळकतीमध्ये पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे. हे बांधकाम तत्काळ पाडून टाकण्यात यावे. प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित बांधकामाला परवानगी असल्याचा दावा त्यांनी केला. वास्तविक, ती बांधकाम परवानगी शेजारील भूखंडावरील असून बिल्डर सर्वांची दिशाभूल करीत आहे व त्याला पालिका प्रशासन साथ देत आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

 

बिनधास्तपणे सुरु असलेले अनधिकृत बांधकाम महापालिका अधिका-यांना दिसत नाही का, हा मोठा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकाम धारक आणि महापालिका अधिका-यांमध्ये काही साटेलोटे आहे काय, अशी शंका नाईक यांनी उपस्थित केली आहे.

 

 

गोरगरीबांच्या बांधकामांवर कारवाई करताना तत्परता दाखविणाऱ्या महापालिका प्रशासनाने बिल्डरने केलेल्या अनधिकृत बांथकामावर कारवाई करण्यातही तेवढीच तत्परता दाखवावी, असे आवाहन नाईक यांनी केले आहे. आठ दिवसांच्या आत संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर यापूर्वी पालिकेने कारवाई केलेल्या अन्यायग्रस्त गोरगरीबांना घेऊन संबंधित अनधिकृत बांधकामासमोर आंदोलन करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी महापालिका आयुक्तांवर राहील, असेही (Punawale News) नाईक यांनी म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.