Pune : लोकसभा निवडणुकीतील विजयाचा गुरुवारी विजयोत्सव 

नगरसेवक हेमंत रासने यांच्यातर्फे मोठया स्क्रिनवर निकाल पाहण्याची सुविधा 

तब्बल ३५० किलो पेढयांचे पुणेकरांना होणार वाटप

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२३ मे) सकाळपासून संपूर्ण देशभरात होणार असून प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्षाचा विजय होणार अशी खात्री देशभरातील कार्यकर्त्यांसह पुण्यातील कार्यकर्त्यांना देखील आहे. त्यामुळे या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून बुधवार पेठेतील काका हलवाईसमोरील कोतवाल चावडी (दगडूशेठ गणपती उत्सवमंडप जागा) येथे करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळपासून पुणेकरांना निवडणूक मतमोजणीचे थेट प्रक्षेपण पाहता यावा, याकरिता मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी ३५० जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना असून त्याकरिता ३५० किलो पेढयांचे वाटप करुन विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने या विजयोत्सवात एकत्रितपणे सहभागी होणार आहेत.

नगरसेवक हेमंत रासने म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने केलेल्या विकासकामांमुळे पुन्हा एकदा देशात भाजपाचे सरकार येणार आहे. देशवासियांच्या मनात मोदी सरकारच्या कामाविषयी समाधान असून केवळ दिल्लीतच नाही, तर महाराष्ट्र आणि पुण्यातही लोकहिताची कामे झाली आहेत. भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारताचे स्वप्न उराशी बाळगून मोदी सरकार कार्यरत असून यंदा देखील जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे. त्यामुळे गुरुवारी या निवडणूक निकालाचा आनंदोत्सव आम्ही एकत्रितपणे साजरा करणार आहोत. तरी पुणेकरांनी या विजयोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.