Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना पाणी नाही!

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही, पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

विधानसभा निवडणुकीत ‘पाणी नाही तर’ मत नाही’, अशी भूमिका शिवाजीनगर, हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांतील नागरिकांनी घेतली होती. त्याचा फटका भाजपला बसला. दोन मतदारसंघांत पराभवाला सामोरे जावे लागले. डेक्कन, आपटे रोड, वडगावशेरी, नगर रोड, बोपोडी, कोंढवा, कात्रज, हडपसर, सिंहगड रोड भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड सुरू आहे. कोंढवा भागात नागरिकांची पाण्यासाठी ओरड सुरु आहे.

नागरिकांना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी आपण पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना कल्पना दिल्याचे मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले.

बाणेर – बालेवाडी, नगररोड, हडपसर, शिवजीनागर भागांतील खासगी सोसायट्यांना पाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहे. दरम्यान, दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली यापुढे शहराच्या पाणीपुरवठयात कपात करू नका, असे आदेश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.