Pune: मार्केटयार्डमध्ये आज 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक

Pune 11000 quintals of agricultural produce arrived in the market yard today

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे तब्बल 50 दिवस बंद असलेले गुलटेकडी येथील मार्केटयार्ड अखेर रविवारी (दि. 31) सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली.

मार्केटयार्ड सुरू झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी रात्री ९ वाजल्यापासूनच बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन येण्यास परवानगी देण्यात आली होती.

रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुमारे २०० गाड्या शेतीमालाची आवक झाली. बाजार समिती प्रशासनाला पहिल्या दिवशी किमान ४०० ते ४५० गाड्या शेतीमालाची आवक होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

मोशी, उत्तमनगर व मांजरी या उपबाजारांमध्ये 4 हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. शहरातील मुख्य बाजार आणि उपबाजार मिळून 471 गाड्यांमधून 15 हजार क्विंटल मालाची आवक झाली.

गेल्या 50 दिवसांपासून बंद असलेला बाजार पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागतील. त्यानंतर आवक व मागणी वाढून भाव नियंत्रणात राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गर्दी कमी ठेवण्यासाठी एका दिवशी पन्नास टक्के आडते आणि दुसऱ्या दिवशी पन्नास टक्के आडते यांना मालाच्या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

बाजार आवारातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक चेकपोस्ट ठेवण्यात आले असून, प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग, मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे शहरामधील अनेक लहान- मोठ्या मंडई सध्या बंद असल्याने शेती मालाला उठाव देखील कमी होत आहे.

बाजार समितीने निर्धारित केल्याप्रमाणे आडते, कामगारांना ओळखपत्र तपासून गेट क्रमांक 1 आणि 4 ने प्रवेश दिला जाणार आहे.

शेतीमाल घेऊन जाणारी वाहने दुपारी 12 नंतर बाहेर काढण्यात यावी, शेतीमाल क्रेट आणि गोनिमध्ये आणावा, कोरोनाचा पार्श्वभूमीवर मास्क वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे, मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, केवळ आडत्यांनाच शेतीमालाची विक्री करता येणार आहे.

निर्धारित केलेल्या वेळेतच शेतीमालाची विक्री करणे, घाऊक विक्री करणे बंधनकारक राहणार आहे, दुबार आणि किरकोळ विक्री करता येणार नाही, बाजार आवारात रिकामी वाहने उभी करू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासकांनी दिला आहे.

तसेच, ओळखपत्र जप्त करून कायमस्वरूपी प्रवेश नाकारला जाणार आहे, आशा अनेक अटी घालून बाजार सुरू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.