Pune: लॉकडाऊनमुळे अडकलेले 1 हजार 131 नागरिक पुणे जिल्ह्यातून विशेष रेल्वेने लखनऊकडे रवाना

Pune: 1,131 citizens stranded due to lockdown left Pune district for Lucknow by special train

एमपीसी न्यूज –  लॉकडाऊनमुळे  वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना घेऊन पुणे स्टेशन ते लखनऊ (उत्तर प्रदेश)  विशेष  रेल्वे आज  रात्री  रवाना झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेली ही दुसरी श्रमिक विशेष रेल्वेगाडी होती. 

यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, प्रेम वाघमारे यांच्यासह रेल्वे तसेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवाशांसाठी बसण्याची चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची  खात्री करुन घेण्यात येत होती.

रेल्वेमधून पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले होते.

राज्यशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम व उत्तर प्रदेश प्रशासनाच्या समन्वयातून पुणे जिल्ह्यातून उत्तर प्रदेशात सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे आहे. नागरिकांना प्रशासनाने केलेल्या या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथून शुक्रवारी जिल्ह्यातील पहिली श्रमिक विशेष रेल्वेगाडी मध्यप्रदेशसाठी सोडण्यात आली होती. आवश्यकतेनुसार परराज्यातील मजूर व व्यक्तींसाठी आणखीही रेल्वेगाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.