Pune : हागणदारीमुक्त पुणेसाठी वळविला वाहनतळे विकसित करण्याचा 12 कोटींचा निधी!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यांवर कुठेही पार्किंग केले जाते, त्यामुळे रस्ता अडविला जातो. पर्यायाने नागरिकांकडून दंड वसूल केला जातो. त्यामुळे वाहनतळ गरजेचे असताना त्याचा सुमारे 12 कोटींचा निधी हागणदारीमुक्त पुणेसाठी वळविण्यात आला. 2020 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुणे महापालिकेने पुन्हा अर्ज केला आहे.

सर्व क्षेत्रीय कार्यलयाकडील ओडिएफ प्लस प्लस साठी शौचालय दुरुस्ती व ब्युटीफिकेशन करण्यासाठी 12 कोटी रुपये वर्गीकरण आज महापालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आले. यापूर्वी आपल्या पुणे महापालिकेचे मानांकन का उडाले?, त्याचा खुलासा करण्यात यावा. शहरात लोकसंख्या वाढती आहे. वाहनतळ गरजेचे असताना प्रशासन ठेवते म्हणून कोणत्याही डॉकेटला मंजुरी देणे बरोबर नसल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे म्हणाले.

प्रशासन चुकीचे डॉकेट आणून भांडणे लावण्याचे काम करते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. छोट्या छोट्या प्रकल्पातून पैसे वाचविले पाहिजे, असे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले.

वाहनतळाचा निधी वर्गीकरण करणे बरोबर नाही. दुसरा निधी देता आला असता शहरात पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी वाहनतळ होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक प्रकाश कदम म्हणाले.

केवळ महापालिका नामांकन करण्यासाठी 12 कोटी रुपये वर्गीकरण करणे बरोबर नाही. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वाहनतळ होणे गरजेचे असल्याचे नगरसेविका आरती कोंढरे यांनी सांगितले. बजेटमध्ये 200 ते 225 कोटी शौचालय दुरुस्तीसाठी आहेत. वाहनतळ महापालिका ताब्यात घेऊन चालविणार असल्याचे जाहीर केले होते. मग, वाहनतळाचे पैसे का काढले? असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचे अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.