Pune : पुण्यात अडकले 1500 कामगार; गावी जाऊ देण्याची महापालिकेची शासनाकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात तब्बल 1500 कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या खाण्याची, राहण्याची व्यवस्था करता करताच महापालिकेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे या कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यात यावे, अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे केली आहे.

आपल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील 1 हजार तर, परराज्यातील 500 असे 1500 कामगार अडकून पडले आहेत. दुसरा पर्याय म्हणजे या कामगारांना बांधकाम साईटवर ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात आला आहे. त्यांना अन्नधान्य देणार असल्याचे पुणे महापालिकेने म्हटले आहे.

21 दिवसांचा लोकडाऊन संपल्यानंतर आणखी 19 दिवसांचा लोकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे या मजुरांना आणखी घरातच राहावे लागणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या कामगारांनीही आपल्या मूळ गावी जाऊ देण्याची मागणी केली आहे. सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. पुण्यात या रोगाची भीती खूपच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

सध्या रेल्वे, बससेवा, विमान सेवा सर्वच वाहतूक करणारी साधने बंद आहेत. त्यामुळे या कामगारांना आहे त्या ठिकाणी थांबण्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या या प्रस्तावावर काय निर्णय होणार, याची कामगारांना उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.