Pune : दिल्लीत अडकलेले पुण्याचे 160 विद्यार्थी आज विशेष रेल्वेने परतणार

Pune : 160 Pune students stranded in Delhi will return today by special train

एमपीसी न्यूज – दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

दिल्ली येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. ही रेल्वे शनिवारी (दि. 16) दिल्लीतून निघाली आहे. या रेल्वेने महाराष्ट्रातील 1 हजार 345 विद्यार्थी प्रवास करीत आहेत. भुसावळ, नाशिक, कल्याण व पुणे रेल्वे स्थानकावर हे विद्यार्थी उतरणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर एकूण 489 विद्यार्थी उतरणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 160 विद्यार्थी, सातारा जिल्ह्यातील 57, सांगली 40, कोल्हापूर 60, लातूर 62, उस्मानाबाद 32, सोलापूर 68, सिंधुदुर्ग 2, रत्नागिरी जिल्ह्यातील 8 विद्यार्थी आहेत.

महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी विविध कारणांनी दिल्लीला गेले होते. यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वाधिक विद्यार्थी गेले होते. देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे हे विद्यार्थी दिल्लीत अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी शासनाने पुढाकार घेत विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. रविवारी हे सर्व विद्यार्थी आपापल्या गावी पोहोचणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.