Pune : तिकोना… पुण्याजवळील हाईकिंग आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण


एमपीसी न्यूज – समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवर असलेल्या या गडाचा माथा त्रिकोणी आकाराचा असल्याने याचे नाव तिकोना! याला ‘वितंडगड’ असेही म्हणतात. पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर तर मुबई पासून तब्बल १२५ कि.मी. वर हा गड आहे.

तिकोना गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासांत सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे, थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या ह्या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाके आहेत तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडेवर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथूनमाघाई फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो. हा झाला अल्प परिचय आता थोडं विस्तृत जाणून घेऊयात…

गडाच्या पायथ्याशी तिकोना पेठ हे गाव आहे 

तिकोना पेठ! बहुतेक गडांना इतिहासकाळापासून असणारी अशी ही गडाची बाजारपेठ! आज मात्र इथे डोंगरउतारावरील चार घरांची वस्ती आहे. इथून गडाचा दगड ना दगड स्पष्ट दिसतो. या गडावर जाण्यासाठी काशिग, घेवंड आणि पायथ्याच्या तिकोना पेठ या तीन वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा चढतात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी. पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या ‘पालथा दरवाजा’तून माचीवर प्रवेश होतो. तर दुसऱ्या वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंड मार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.

माचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपली वाट अडवते. महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात विशेषत: प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा लढाईच्या मैदानी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक!

पुढे आले, की उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांच्यात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. यापुढील छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. या लेण्यासमोर एक तळेही खोदलेले आहे. त्याचा सातवाहनोत्तर असा काळ निश्चित करण्यात आला आहे. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. पुढे यामध्ये कालपरत्वे काही बदलही झाले. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी.

या लेण्याच्या समोर पूर्वी एक सतीशिळा होती. तिच्यावरचे शिल्पांकन फारच आगळे होते. दोन थरांत कोरलेल्या या शिल्पपटात वरच्या भागात एका पुरुषाच्या पायाखाली एक महिला दाखवली होती. तर खालच्या भागात हाती पुष्पमाला घेतलेल्या दोन महिला कोरल्या होत्या. पण याचा अर्थ लावण्यापूर्वीच ही सतीशिळा इथून गायब झाली. या अशा जागोजागीच्या शिल्पांची तातडीने नोंद करत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.

हे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी, काही घरांचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी म्हणजे ‘अमृताहुनी गोड’! महाराष्ट्राएवढे गड अन्यत्र कुठेही नाहीत. पण या प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. शास्त्रीय भाषेत जरी सगळीकडचे पाणी ‘एचटूओ’ असले तरी गडकोटांवरच्या या अशा अमृतमय पाण्यासाठी काही खास संज्ञाच तयार करावी लागेल.

बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती..हे खोदकाम मनावरील दडपण वाढवत जाते. हे करणाऱ्या, खोदणाऱ्या त्या गडपतीलाही हेच अपेक्षित! त्या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा, त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा. इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामथ्र्य हे त्याच्या अशा छोटय़ा छोटय़ा जागांमधून प्रगट होत असते.

बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. यानंतर दुरवस्थेतील तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

तिकोन्याचा बालेकिल्ला खूपच छोटा. ऐन माथ्यावरचे छोटेखानी त्र्यंबकेश्वराचे मंदिर, एक मोठा तलाव, दोन-चार खोदीव टाक्या, धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. पण गडांवर प्रेम करणाऱ्यांना यातही खूप काही इतिहास दिसू लागतो.

"Tikona

"Tikona

"Tikona

"Tikona

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.