Pune : शहरात आज 168 जणांना डिस्चार्ज; 7 मृत्यू, 87 नवे रुग्ण

New 87 coronavirus cases detected, 7 covid19 deaths and 168 cured patients discharged today in Pune

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 87 झाली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला. 168 जण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून असलेल्या क्रिटिकल रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली असून सध्या 115 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील 32  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2,824 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,284, एकूण मृत्यू 163  झाले आहेत.दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. मात्र, व्हेंटिलेटरवर असलेले आणि क्रिटिकल रुग्ण यांच्या संख्येत झालेली वाढ काळजी वाढविणारी आहे.

ससूनमध्ये बुधवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 103 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे कोरोनाच्या तावडीतून मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोरोनामूळे जेष्ठ नागरिकांचा जास्त संख्येने बळी जात आहे. त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे मृत्यू होत असले तरी या नागरिकांना किडनी विकार, डायबेटीस, असे अनेक आजार आहेत.
मृतांमध्ये येरवड्यातील 65 वर्षीय महिलेला कोरोना व्यतिरिक्त अतिसार, निमोनियाचा आजार होता. ताडीवाला रोड भागातील 42 वर्षीय पुरुषालाही निमोनिया, किडनी विकार, तर रामटेकडी येथील 70 वर्षीय महिलेलाही निमोनिया, हडपसर येथील 48 वर्षीय पुरुषालाही कोरोना व्यतिरिक्त किडनी विकार, निमोनिया, हृदयाचा असे आजार होते.
गंजपेठेतील 54 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गुलटेकडी येथील 57 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 69 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

पुणे जिल्हयात 3 हजार 258 बाधीत रुग्ण असून 1 हजार 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.