Pune : ‘लायन्स’मुळे पोलिसांना मिळाले घरचे जेवण – रश्मी शुक्ला

 
एमपीसी न्यूज – “गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना घरचे जेवण देण्यासाठी लायन्स क्लबने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांच्या या भोजनव्यवस्थेमुळे आमच्या पोलीस कर्मचा-यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलीस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासली नाही, अशी भावना पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केली.
 

गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना घरचे जेवण मिळावे, याकरिता लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले होते. गेली 12 वर्षे या क्लबतर्फे भोजनव्यवस्था करण्यात येते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या श्रमपरिहार केंद्राचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, राज मुछाल, प्रांत जनसंपर्क अधिकारी आशा ओसवाल, पोलीस उपनिरीक्षक पवन पाटील, सागर पाटील, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष चंद्रकांत चमडिया, सचिव त्रितेश रांका व कल्पेश पटनी यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
तीन हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स आणि पोलीस मित्रांना पॅकेट्सच्या रुपात जेवण देण्यात आले. त्याचबरोबर या केंद्रावर 800 ते 1000 लोकांनी जेवण केले. अतिशय पौष्टिक आणि ताजे जेवण येथे उपलब्ध करुन देण्यात आले. घरगुती पोळ्या, भाजी, पुलाव व गुलाबजाम आदी पदार्थ यामध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 11 ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था सुरु होती, असे क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत चमडिया यांनी सांगितले.

महापौर मुक्ता टिळक यांनी पोलिसांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असलेल्या पोलीस व पोलीस मित्रांसाठी सामाजिक भावनेतून लायन्स क्लबने हा उपक्रम राबविल्याचे समाधान आहे, असे गिरीश मालपाणी म्हणाले. बाहेरचे तेलकट खाऊन प्रकृती बिघडू नये, यासाठी गेली 12 वर्षे घरचे जेवण पोलिसांना देत असल्याचे फतेचंद रांका यांनी सांगितले. पवन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राज मुछाल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.