Pune : आणखी 19 दिवसांचा लॉकडाऊन: अन्नदान, जेवण आणखी किती दिवस देणार?, दानशूरांचाही हात आखडणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. या काळात सामजातील दानशूर मंडळींनी गोरगरीब, गरजू नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान, जेवणाची सोय केली. आता आणखी 19 दिवसांचा लॉकडाऊन मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काळात दानशूर मंडळींना काही प्रमाणात मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचेच नुकसान होण्याची भीती आहे. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, आशा दुहेरी अवस्थेत सापडला आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीरच होत चालले आहे. वाढते रुग्णही चिंताजनक आहेत. 330 च्या आसपास कोरोनाचे रुग्ण गेले असून, या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही 40 च्या आसपास गेली आहे. हातावरच पोट असणाऱ्या नागरिकांचे सध्या अवघड झाले आहे.

एकूण 40 दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात जीवन जगणे कठीण झाले आहे. शासन मदत देऊन अशी किती देणार?, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पोट कसे भरणार?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

समाजात राहत असताना त्याचे काहीतरी देणे लागते, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक दानशूर मंडळी, सामाजिक संस्था अन्नदान, जेवण देण्याचे काम करीत आहेत. तर काहीजण थोडाफार किराणा माल घरपोच देत आहेत. मात्र, आगामी काळात आणखी मदत करणे कठीण होणार असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.