Pune : ताम्हिणी घाटात बस कोसळून 2 ठार, 24 जखमी

पुण्याहून कोकणात सहलीला जाताना झाला अपघात

एमपीसी न्यूज- बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून बस कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर 24 जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्वजण कोकणात सहलीसाठी निघाले असताना शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे.

संजिवनी निवृत्ती साठे (वय. 55, रा. डी. पी. रोड औंध) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. आणखी एक पुरुषाचा मृत्यू झाला असून त्यांचे नाव समजू शकले नाही. जखमींमध्ये पुनम योगेश लांडे (वय. 34), हर्षवर्धन योगेश लांडे (वय. 7), दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋषिकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्मा प्रशांत जाधव, पुष्पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, निवृत्ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, योगेश पाठक, विधीता जाधव, श्रावणी पाठक आणि बसचालक अशी यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुट्टी असल्याने पुण्यातील एक कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक असे 26 जण पुण्यातून रात्री साडेबाराच्या सुमारास खासगी बसने कोकणात सहलीसाठी निघाले होते. ताम्हीणी घाटातून ही बस जात असताना रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही बस ताम्हीणी घाटातील वंदन हॉटेलच्या समोर आली असता चालकाचा ताबा सुटून बस एका पुलावरून खाली ओढ्यात कोसळली.

अपघातानंतर काही जण बसमधून बाहेर पडले. तेथे मोबाईलला नीट सिग्नल मिळत नव्हते. त्यामुळे थोडेसे पुढे येऊन एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून पौड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.