Pune : ससून रुग्णालयात आणखी 2 महिलांचा मृत्यू ; मृतांमधील 20 वर्षीय महिलेची नुकतीच झाली होती प्रसूती

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयात रोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच असून सोमवारी आणखी 2 महिला या आजारामुळे दगावल्या. यामध्ये हडपसर भागातील 20 वर्षीय महिलेची काही दिवसांपूर्वीच प्रसूती झाली होती. या महिलेचे बाळ निगेटिव्ह आणि सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

तर, याच ससून रुग्णालयात आणखी एका 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिलांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. आजपर्यंत 108 रुग्णांचा ससूनमध्ये मृत्यू झाला आहे.

115 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्हयात 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 903 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आज पुणे जिल्ह्यात 122 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एकट्या ससून रुग्णालयातच शंभरपेक्षा जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत.

रोज 2 ते 3 रुगांचा या रुग्णालयात बळी जात आहे. त्यामुळे हे रुग्णालय म्हटले की कोरोनाच्या रुग्णांना घामच फुटत आहे. सातत्याने मृत्यू होत असल्याने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली. त्यानंतरही मृत्यू काही थांबताना दिसून येत नाही.

ससूनमध्ये गंभीर स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांना किडनी विकार, निमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक आजार असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे 60 ते 80 वयोगटातील जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.