Pune: जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 तर रुग्ण संख्या 204 – महापौर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून मृतांपैकी एकजण बारामतीचा तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे शहरात 168, पिंपरी-चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 204 वर जाऊन पोहचली आहे. असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 10 बळी गेले. पुणेकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मास्क वापरणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक केले आहे. पुणे शहरात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण सापडले, त्याला चार आठवडे पूर्ण झाले. त्यानंतर साथ आटोक्यात येण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पुणे शहरात मध्यवस्तीतील प्रमुख पेठांसह काही भागात तर पिंपरी-चिंचवडमधील चार भाग सील करून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी आदेशाचे नागरिक योग्य पद्धतीने पालन करताना दिसत नाहीत. स्वतःला, आपल्या कुटुंबाला व समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

बारामतीत कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा मृत्यू

बारामती शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज (गुरुवारी) पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा त्रास होता, त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होती. त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.