Pune : चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे पुणेकरांना गाजर ; 15 टक्केच काम पूर्ण

एमपीसी न्यूज – चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे भाजपने पुणेकरांना गाजरच दाखविले आहे. या योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, आतापर्यंत केवळ 15 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

समान पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यात आले होते. त्याचे व्याजही पुणेकरांना भरावे लागत आहे. ही योजना मार्गी लागल्यास पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ 9 टीएमसी पाणी लागणार आहे. 50 टक्के पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शिवाय पाण्याची गळती रोखण्यात यश येणार आहे. पुण्यात अनेक ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहेत. त्या सातत्याने फुटत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. रोज धरण क्षेत्रात पाऊस हजेरी लावत आहे. पण, पुणेकरांना दोन वेळ, चांगल्या दाबाने पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. पुणेकरांना पाणी मिळत नसल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. पाणी नाही तर मत नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. शिवाजीनगर मतदारसंघांतील डेक्कन, आपटे रोड भागांत पाण्याची समस्या गंभीर आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करू नये, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.