Pune: रुबी हॉल क्लिनिकच्या 19 नर्ससह 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या नामवंत रुग्णालयातील 19 नर्ससह 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी रुबी हॉस्पिटलमधील एका नर्सला कोरोनाची बाधा झाली होती.

त्यानंतर खबरदारीचा उपाय रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर अशा सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यात 19 नर्स आणि इतर सहा कर्मचारी असे 25 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. या 25 जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.एका रुग्णालयातील एवढ्या नर्सना कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व नर्स तसेच संबंधित कर्मचारी यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट अर्थात पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पीपीई किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय सहकाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी यांचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांशी उपचारांच्या निमित्ताने थेट संपर्क येत असतो. पुरेसे वैद्यकीय संरक्षण नसतानाही ही सर्व मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या प्रत्येक योद्ध्याची काळजी शासनाने घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.