Pune : हतनूर वेटलँड ‘ चे पक्षी वैविध्य जपण्याची गरज- अनिल महाजन

​‘सेव्ह वेटलँड हतनूर’ व्याख्यानाला निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात 25 हजाराहून अधिक पक्षी, 280 प्रजाती सापडतात, त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक पातळीवरचा ‘रामसर साईट ‘चा दर्जा मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी केले.

‘जीविधा’, ‘देवराई फाऊंडेशन‘, ‘निसर्गसेवक’ या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनील महाजन यांच्या व्याख्यानाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अनिल महाजन म्हणाले, ” 1980 च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परिसरात तापी, पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले आर्क्टिक परदेशातूनही येथे ‘रेड फलरोप ‘ सारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले . येथे 280 प्रकारचे पक्षी दिसू लागले. 2012 च्या पक्षी गणनेनुसार त्यांची संख्या 25 हजार असल्याचे लक्षात आले. मात्र, अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैव वैविध्य धोक्यात येऊ शकते”

“हतनूरचे जैववैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे. अभयारण्य झाले की येणाऱ्या संभाव्य बंधनांना स्थानिकांचा विरोध आहे . राजकारण्यांची अनास्था आहे . इराणच्या ‘रामसर’ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैव वैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो. तसा दर्जा हतनूरला मिळण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रस्ताव करणे आवश्यक आहे. जायकवाडी, वेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नासिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत. मात्र नवेगाव, उजनी, हतनूर सारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत. या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे. हतनूर प्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही”अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली .

यावेळी अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राणा राजपूत यांचा उष:प्रभा पागे ,डॉ . विनया घाटे ,धनंजय शेडबाळे ,राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्तविक केले ,धनंजय शेडबाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.