BNR-HDR-TOP-Mobile

Pune : किल्ले रोहिडा उर्फ बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड……

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मागच्या आठवड्यात रोहिडा/विचित्रगड/बिनीच्या किल्ल्याची भटकंती झाली. पुण्यापासून दीड दोन तासांच्या अंतरावर असलेला हा किल्ला गर्दीपासून कोसो लांब आहे. रोहिड्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम भोर गाठावे लागते. तेथून आठ किमी अंतरावर असलेलं बाजारवाडी गाव हे रोहिड्याच्या पायथ्याचं गाव आहे. या गावापासूनच गडावर जाण्यासाठी रस्ता आहे.

आम्ही रोहिड्याच्या दिशेने प्रवास करत असताना पाऊस येत-जात होता. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. पावसाला नुकतीच सुरवात झाल्यामुळे आजुबाजुची शेते (काही अपवाद सोडला तर) अद्यापही काळीशार दिसत होती. मध्येच येणारा पाऊस "क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे" या बालकवींच्या कवितेची आठवण करून देत होता.

बाजारवाडी गावात पोहोचण्यापूर्वीच रोहिड्याची तटबंदी नजरेत भरली तर दोन्ही बाजुचे बुरुज ठळकपणे दिसत होते. क्षणाचाही वेळ न दवडता आम्ही रोहीड्याची चढण सुरु केली. ही चढाई म्हटलं तर सोपी आणि म्हटलं तर अवघड अशा स्वरुपाची आहे. वर चढण्यासाठी कुठलीही छुपी वाट नाही. पायथ्यापासूनच अगदी वरपर्यंतची वाट स्पष्ट दिसते. तासाभराची पायपीट करून आम्ही किल्याच्या पहिल्या आणि मुख्य दरवाजापाशी पोहोचलो.

गडाचा हा दरवाजा अजुनही भक्कम आहे. जुन्या काळाचे वैभव दर्शवणारा नवा लाकडी दरवाजा याठिकाणी बसवण्यात आला आहे. या दरवाज्याच्या चौकटीवर पुसटशी दिसणारी एक गणेशपट्टी आहे. दरवाजातून आत प्रवेश करून काही पाय-या चढून वर गेल्यानंतर पाण्याचे टाके दिसते. आणखी काही पाय-या चढल्यानंतर आणखी दरवाजा लागतो. येथील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दगडांमध्ये हत्तीचे शीर कोरण्यात आलेले आहे. तर डाव्या आणि उजव्या बाजूच्या दगडांमध्ये शिलालेख कोरल्याचे आढळतो.

संपूर्ण रोहिडा किल्ला पाहण्यासाठी दीड तासाचा अवधी लागेल. सहा बुरुजांनी सजलेल्या या गडाच्या सर्व बाजू अद्यापही भक्कम आहेत. या गडाची वैशिष्ट म्हणजे तटबंदी, पाण्याची खोदीव व कोरीव टाकी, भक्कम दरवाजे, चुन्याचा घाणा, चोरदरवाजा, चोरवाटा, अभेद्य बुरुज, कोरीव काम, शिलालेख, पाण्याचे तलाव हे सर्व गडावर अद्यापही सुस्थितीत आहेत.

किल्ल्यासंदर्भात इतिहासातील नोंदी (किल्ल्यावरील माहिती फलकावरून)

या किल्ल्याची निर्मिती राजा भोज यांच्या कालखंडात झाली असून त्यांचा इथे अंमल होता. यादवांच्या पराजयानंतर हा गड परकीयांच्या ताब्यात होता. 1657-58 मध्ये शिवाजीराजांनी हा गड जिंकला. त्यानंतर 1665 साली शिवाजी महाराजांनी पुरंदर तहात हा गड मुघलांना दिला. 24 जून 1670 रोजी रोहिडा पुन्हा स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव विचित्रगड असे ठेवले. 1684 साली कान्होजी जेधे घराण्यातील शिवाजी जेधे, सर्जेराव जेधे मुघलांना मिळाले. त्यावेळी संताजी निंबाळकर रोहिड्याचे हवालदार होते. 1687 साली मुघलांनी पुन्हा रोहिडा जिंकला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेरावास कौल देऊन कानउघाडणी केली आणि रोहिड्याच्या स्वारीवर पाठवले. सर्जेरावांनी नंतर रोहिडा जिंकुन घेतला.

संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर (1689) जेधे, खोपडे, शिरवळचे मुघल यांच्यात रोहिड्याबद्दल बरेच राजकारण झाले. मराठ्यांच्या किल्लेदारांची इंगळे, पालकर अशी नावे आढळतात. गडावर श्रीराम जन्मोत्सव होत असे. 1761 साली रोहिडा खो-यातील अनेक सैनिक पानिपतावर गेले होते. हरियाणामध्ये अद्यापही रोड (रोहिडाचा अपभ्रमंश) मराठा जातीचे लोक आजही आहेत. 1818 साली इंग्रजांनी रोहिडागड भोर संस्थानाकडे ठेवण्यास अनुमती दिली. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील सर्व राज्ये खालसा करण्यात आली. यामुळे गडावरील लोक खाली उतरु लागले व गड ओस पडू लागला.

HB_POST_END_FTR-A4

.