Pune: शहरात आणखी तिघांना संसर्ग, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 वर!

एमपीसी न्यूज – पुण्यातील एका कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे. त्यापैकी सातजण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे शहरातील एका कोरोनाबाधित पुरुषाच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली असून यात आई, वडील आणि पत्नी यांचा समावेश आहे.

पुण्यात आज संध्याकाळपर्यंत एकूण 748 जणांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली.  त्यापैकी 716 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. अजून सातजणांच्या चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. कोरोना निगेटीव्ह असलेल्या 723 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटीव्ह असलेले सातजण उपचारांनंतर बरे झाले असून त्यांनाही घरी पाठविण्यात आले आहे.

दोघांची प्रकृती चिंताजनक

कोरोनाचे एकूण 17 रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात एकूण 12 जण दाखल आहेत तर भारती रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, केईएम रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय (नगर रोड), सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड) या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

 

परदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांची एकूण संख्या 2,042 होती. त्यापैकी 1318 जणांची क्वारंटाईनची 14 दिवसांची मुदत संपली असून उर्वरित 724 जण अजून निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.