Pune: राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांना कोरोनाची लागण, 97 जवान क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पुण्यातील ग्रुप दोनमधील तीन जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी पाठविलेल्या तुकडीमध्ये या तीन जवानांचा समावेश होता.

एसआरपीएफच्या 100 जवानांची एक तुकडी दोन महिन्यांपासून मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. ही तुकडी सोमवारी पुण्यात परत आली. दरम्यान, यातील काही जवानांना सर्दी, खोकला अशी कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता यातील तीन जवान कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून या तुकडीतील इतर 97  जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई हा कोरोनाचा देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट आहे. या भागात दोन महिने बंदोबस्तावर असताना तीन जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.